चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये उघडकीस आलेल्या कथित नवजात बालक विक्री प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप महिला महानगर आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपी, सूत्रधार, दलाल तसेच संबंधित व्यक्तींवर कोणताही राजकीय, सामाजिक किंवा अन्य प्रकारचा प्रभाव न पाहता कठोर आणि निष्पक्ष कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि इतर सर्व बाबींची सखोल चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे.
महिला आघाडीने या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, नवजात बालकांची विक्री हा अत्यंत गंभीर आणि मानवतेला काळिमा फासणारा प्रकार असल्याचे नमूद केले. अशा अमानुष कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही कायद्यापासून सूट मिळता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“गुन्हेगाराला कोणताही पक्ष, जात किंवा धर्म नसतो. गुन्हा करणारा हा केवळ गुन्हेगार असतो,” असे स्पष्ट करत या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली.




