चंद्रपूर : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचे शासकीय यंत्रणेमार्फत न्याय्य, पारदर्शक आणि तत्परतेने निराकरण करण्याच्या उद्देशाने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तसेच प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
जुलै 2026 महिन्याचा पहिला सोमवार 6 जुलै रोजी असल्याने, दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार, तक्रारदारांनी सर्वप्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये आपली तक्रार दाखल करावी. तालुकास्तरावर तक्रारीचे निराकरण न झाल्यास किंवा संबंधित व्यक्तीचे समाधान झाले नसल्यासच जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करता येणार आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी तक्रार सादर करताना विहित नमुन्यातील अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच संबंधित अर्ज 15 दिवस आधी दोन प्रतींमध्ये सादर करावा. तक्रार किंवा निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असणे बंधनकारक असून, त्यानंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी निर्धारित प्रक्रियेचे पालन करून लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.




