पुणे: राज्य शासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत पुणे व सोलापूर जिल्ह्यात व्यापक तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली. दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल आस्थापनांची तपासणी करताना सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला, तर अनेक आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले.
शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे दुधामध्ये भेसळीचा संशय आढळल्याने १२,२७८ लिटर दूध नष्ट करण्यात आले. तसेच संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
आंबेगाव येथील उमिया मिल्क प्रॉडक्ट येथे अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने १,१५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम जप्त करण्यात आले. या प्रकरणातही संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरी येथे आवश्यक परवान्याशिवाय आणि अस्वच्छ ठिकाणी मिठाईचे उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. प्रशासनाने १,८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट केला.
याशिवाय, माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूध निकृष्ट असल्याने नष्ट करण्यात आले असून संबंधित परवानाही निलंबित करण्यात आला.
दरम्यान, पुण्यातील ताथवडे येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना उत्पादनावरील लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.




