(प्रणयकुमार बंडी)
घुग्घुस (जि. चंद्रपूर) : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच सर्व संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामगीता ग्रंथ दिंडी-पालखी शोभायात्रा, समाज प्रबोधनपर भारुड-कीर्तनाचा भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम बहुउद्देशीय वारकरी गुरुदेव सेवा मंडळ, घुग्घुस यांच्या वतीने रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रयास सांस्कृतिक सभागृह, केमिकल वार्ड, प्रभाग क्रमांक ४, घुग्घुस येथे संपन्न होणार आहे.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी समाजपरिवर्तनासाठी आपल्या विचारांच्या दीपाने अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचे महान कार्य केले. देशातील खेडोपाड्यांत गुरुदेव सेवा मंडळ स्थापन करून त्यांनी ग्रामविकास, स्वच्छता, नैतिकता व समाजएकात्मतेचा संदेश दिला. “माझे सर्व वाङ्मय तळागडात, म्हणजे देशातील प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजे,” हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. ग्रामसुधारणेचे महत्त्व अधोरेखित करणारा ग्रामगीता हा महान ग्रंथ त्यांनी समाजाला दिला असून, त्याच प्रेरणेवर आज विविध शासकीय योजना राबविल्या जात आहेत.
या विचारांना अनुसरून बहुउद्देशीय वारकरी गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने विविध समाजोपयोगी व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक-सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे व आपल्या परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




