गडचिरोली : माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, पोलीत ब्युरो सदस्य व केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण ६१ माओवादी सदस्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पितांमध्ये ०२ डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाचे वरिष्ठ कॅडर सदस्य सामील आहेत.
या माओवादींकडे एकूण ५४ अग्निशस्त्रे असून त्यांनी माओवादी गणवेशात येऊन आत्मसमर्पण केले. महाराष्ट्र शासनाने या सर्वांवर मिळून ५ कोटी २४ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.
आत्मसमर्पण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते आत्मसमर्पित माओवादींना एस.आर.ई निधीतून धनादेशांचे वितरण करण्यात आले. पुनर्वसन प्रक्रियेअंतर्गत या सर्व आत्मसमर्पितांना एकत्रितपणे ३ कोटी ०१ लाख ५५ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले आहे.
गडचिरोली पोलिस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण १०१ माओवादी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उल्लेखनीय कार्यासाठी गडचिरोली पोलिस दलातील सर्व अधिकारी व अंमलदारांना १ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले. त्यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा दलांच्या धाडसी आणि संयमी कारवाईमुळे नक्षलवाद संपुष्टात आणण्याच्या दिशेने राज्य ठोस पावले टाकत आहे.”
या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादविरोधी मोहिमेला नवी गती मिळाली आहे.




