गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक आणि सामाजिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने उभारलेल्या ४.५ एमटीपीए क्षमतेच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाचे, १०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे, सीबीएसई शाळेचे आणि सोमनपल्ली येथील कर्मचारी वसाहतीच्या उद्घाटन व पायाभरणी समारंभ पार पडला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रसंगी सांगितले की, “लॉयड्स मेटल्सने सुरू केलेल्या या लोह प्रकल्पामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांचे जीवनमान उंचावेल. जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन करतच विकास साधणे हे आमचे धोरण आहे. या प्रकल्पांमुळे गडचिरोली भविष्यात राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समाविष्ट होईल, असा मला विश्वास आहे.”
कार्यक्रमानंतर गडचिरोली कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात ४० लाख वृक्ष लागवड उपक्रमालाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते औपचारिक सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पद्मश्री तुलसी मुंडा, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, जिल्हाधिकारी अविशांत पंडा आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
गडचिरोली जिल्ह्यातील हा बहुआयामी विकास उपक्रम स्थानिक रोजगार, शिक्षण व आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.





