वर्धा, 9 जुलै 2025 (बुधवार): भारतीय हवामान विभागाने वर्धा जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करताना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून, पुढील तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सावधगिरीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आज बुधवार, ९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच सर्व कोचिंग सेंटर्सना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील काही रस्ते आधीच पाण्याखाली गेले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




