चंद्रपूर — २१ जून २०२५ रोजी धानोरा टोल नाका, घुग्घुस रोड येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक केली जात असलेल्या ७२ गोवंशांची सुटका केली. या प्रकरणात एकूण ६ आयशर ट्रक, पायलटिंगसाठी वापरलेले वाहन, व ७२ गोवंश असा एकूण १ कोटी ७० लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण १८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, घुग्घुस मार्गे पडोली, चंद्रपूर ते तेलंगणाकडे कत्तलीसाठी गोवंशांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार धानोरा टोल नाका येथे नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी खबऱ्याच्या माहितीनुसार ६ ट्रक दिशेने आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता, जनावरांचे हात, पाय, तोंड बांधून, कोणतीही योग्य व्यवस्था न करता व ट्रकच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात दाटीवाटीने भरून अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
वाहतूक करणाऱ्यांनी जनावरे भंडारा व गोंदिया येथून खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या. मात्र तपासाअंती उघडकीस आले की, त्या पावत्यांवर शासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सही करून कागदपत्रे तयार करण्यात आली होती. त्यामुळे ही वाहतूक कायदेशीर असल्याचे दाखवून आरोपी अवैधरित्या प्राण्यांची वाहतूक करीत होते.
सदर प्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींनाच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, वरील जनावरे तात्पुरत्या सुरक्षेसाठी … फाउंडेशन, छोटा नागपूर, जि. चंद्रपूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व घुग्घुस पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.




