नागपूर – नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी व इयत्ता पहिलीपासूनच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, तसेच अन्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या उपक्रमामुळे महापालिकेच्या मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये पालकांचा विश्वास वाढत आहे. सध्या मनपा शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू माध्यमांसोबतच 11 शाळांमध्ये सेमी इंग्रजी तर 7 शाळांमध्ये पूर्ण इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे महापालिकेच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली आहे.
या गुणवत्तेचा परिणाम परीक्षेच्या निकालांवरही दिसून येतो. यंदाच्या दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये मनपा शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी दिली.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे नागपूरमधील शासकीय शिक्षणव्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होत असून, अधिकाधिक पालक आपल्या पाल्यांना मनपा शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी पुढे येत आहेत.




