गडचिरोली : नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांविरोधातील मोहिमेला आणखी बळकटी देण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. छत्तीसगडच्या सीमेवरील कवंडे येथे अवघ्या २४ तासांत नव्या पोलिस ठाण्याची निर्मिती करून पोलिसांनी नक्षल्यांना थेट आव्हान दिले आहे.
गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० पथकाचे १ हजार कमांडो, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या २३ चमू, ५०० पोलिस अधिकारी आणि शेकडो नव्याने भरती झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे पोलिस ठाणे उभारण्यात आले आहे. यासोबतच, खासगी कंत्राटदारांचीही मदत घेण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन
यानव्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल आणि केंद्रीय राखीव दलाच्या ३७ क्रमांकाच्या बटालियनचे कमांडंट दाओ किंडो यांच्या उपस्थितीत पार पडले.
स्थानिक नागरिकांसाठी मदतीचे वाटप
उद्घाटन सोहळ्यादरम्यान, स्थानिक नागरिकांसाठी विविध मदतीचे वाटपही करण्यात आले. महिला आणि पुरुषांना कपडे, शेती व दैनंदिन वापराचे साहित्य, तर विद्यार्थ्यांना शालेय आणि क्रीडा साहित्याचे वाटप करून पोलिसांनी समाजाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित केला.
सीमावर्ती भागात पोलिस ठाण्यांची संख्या वाढवण्यावर भर
गडचिरोली पोलिसांनी मागील दोन वर्षांत छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात सात नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती केली आहे. यामुळे नक्षल्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. कवंडे येथील नवीन पोलिस ठाण्यामुळे या भागातील नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार असून, नक्षलविरोधी कारवायांना गती येणार आहे.
गडचिरोली पोलिसांचे हे पाऊल नक्षलवाद्यांसाठी मोठा धक्का ठरू शकतो, तर स्थानिकांसाठी सुरक्षिततेचा नवा विश्वास निर्माण करणारे ठरणार आहे.




