यवतमाळ: बंजारा समाजाचे दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक बंजारा तांड्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बोरगाव दाभडी येथेही मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये बंजारा समाजातील तरुण-तरुणींसह आबालवृद्धांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला.
मिरवणुकीत बंजारा समाजाचे पारंपरिक लोकनृत्य आणि वाद्ये यामुळे विशेष रंगत आली. गावभर ढोल-ताशांच्या गजरात आणि “संत सेवालाल महाराज की जय” या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले. या सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थांनीही उस्फूर्त प्रतिसाद दिला.
संत सेवालाल महाराज यांच्या विचारांना उजाळा देत समाज एकता, संस्कृती जपण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत परंपरा पोहोचवण्याचा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला.




