नागपूर: स्त्रीवादाच्या अभ्यासात बौद्ध काळाचा अभ्यास महत्त्वाचा असल्याचे मत ज्येष्ठ लेखिका सुजाता लोखंडे यांनी व्यक्त केले. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महिला विंगतर्फे आयोजित महिला परिषदेत त्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
ही एक दिवसीय परिषद महिला विभागाच्या अलका चौकीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केली होती. व्यासपीठावर संस्थेच्या विदर्भ उपाध्यक्षा रमा वासनिक, सचिव ज्योती खोब्रागडे, धार्मिक कार्यकर्त्या उषा बौद्ध, तसेच संजीवनी सखी मंचच्या अध्यक्षा कल्पना मेश्राम उपस्थित होत्या.
सुजाता लोखंडे म्हणाल्या, “तथागत बुद्धांनी अर्हत पद प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत स्त्रियांनाही पुरुषांसारखेच स्थान दिले आहे. ते खरे समानतेचे प्रेरक होते. धम्म चळवळ ही केवळ धार्मिक नव्हे, तर खरी मानव मुक्तीची चळवळ आहे. त्यामुळे स्त्रीवादाचा अभ्यास करताना बौद्ध काळाचा अभ्यास होणे आवश्यक आहे.”
या परिषदेच्या माध्यमातून बौद्ध धम्म आणि स्त्री सक्षमीकरण यांचा परस्परसंबंध अधोरेखित करण्यात आला. विविध वक्त्यांनी स्त्री-पुरुष समानतेबाबत तथागत बुद्धांनी दिलेल्या शिकवणींवर विचार मांडले.




