चंद्रपूर : जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलन उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडु कुंभार, पोलीस उपाधीक्षक (अँटी करप्शन) मंजुषा भोसले, पोलीस उपाधीक्षक (गृह) निशिकांत रामटेके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, कृषी विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी सागर पोटदुखे, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरीश कालकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रत्येक विभागात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. याशिवाय भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना त्यांच्या स्तरावर भ्रष्टाचार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यावर भर देण्याचेही आवाहन केले.




