(प्रणयकुमार बंडी)
घुग्घुस, चंद्रपूर : घुग्घुस नगर परिषद हद्दीत पाण्याची टंचाई लक्षात घेता जुन्या फिल्टर प्लांटमधून निघणारे पाणी परिसरातील विहिरींमध्ये सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नगर परिषद घुग्घुसचे स्वीकृत नगरसेवक तौफिक शेख यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या फिल्टर प्लांटमधील बॅकवॉश व ओव्हरफ्लोचे पाणी नाल्याद्वारे रेल्वे सायडिंगकडे सोडले जाते. त्याऐवजी होम पाइप टाकून हे पाणी वणी रोड ते ताराबाई सोसायटी परिसरातील विहिरींमध्ये सोडण्यात यावे.
असे केल्यास त्या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल आणि भविष्यात त्या भागात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच हे काम लवकरात लवकर करण्यात यावे, जेणेकरून त्या परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार नाही, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीवर नगर परिषद प्रशासन काय निर्णय घेते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.




