Monday, February 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

डोंगरतालच्या वंशिका डोडकेची राष्ट्रीय रग्बीपर्यंतची प्रेरणादायी झेप

नागपूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण; अंडर-१५ राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

नागपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण ठरला असून डोंगरताल, पोस्ट देवलापार, ता. रामटेक, जि. नागपूर येथील अनुसूचित जमातीतील खेळाडू वंशिका डोडके हिची महाराष्ट्र राज्याच्या सब-ज्युनियर (अंडर-१५) मुलींच्या रग्बी संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे वंशिका ही नागपूर जिल्ह्यातून सब-ज्युनियर रग्बीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी पहिली खेळाडू ठरली असून हा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

वंशिका १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी भुवनेश्वर (ओडिशा) येथे कलिंगा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणाऱ्या सब-ज्युनियर (अंडर-१५) राष्ट्रीय रग्बी 7’s अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे. ही स्पर्धा इंडियन रग्बी फुटबॉल युनियन (IRFU) यांच्या वतीने, ओडिशा शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभाग तसेच ओडिशा रग्बी फुटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

साधी पार्श्वभूमी, मोठी स्वप्ने

वंशिका डोडकेचे कुटुंब पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. तिचे वडील २ एकर शेती करणारे शेतकरी असून आई गृहिणी आहे. मर्यादित उत्पन्नात घरखर्चासोबत क्रीडा प्रशिक्षणाचा खर्च उचलणे कुटुंबासाठी मोठे आव्हान होते. वंशिकाला एक लहान भाऊ असून तोही रग्बी खेळतो. दोन्ही मुलांच्या क्रीडा प्रवासात पालकांनी आर्थिक अडचणी असूनही कधीही पाठ फिरवली नाही.

जंगलालगतच्या भागातील संघर्ष

डोंगरताल परिसर हा घनदाट जंगलालगतचा भाग असून येथे वाघांसह इतर जंगली प्राण्यांचा वावर आढळतो. अशा धोकादायक वातावरणात नियमित सरावासाठी घराबाहेर पडणे हे मोठे धाडसाचे काम आहे. मात्र वंशिकाने भीतीवर मात करत आपला सराव कधीही खंडित होऊ दिला नाही.

मैदानाविना घडलेले यश

डोंगरताल व देवलापार परिसरात खेळाचे मैदान किंवा मूलभूत क्रीडा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतातील मोकळ्या जागेत, असमतल जमिनीवर आणि पिकांच्या कडेला वंशिकाने सराव केला. अपुऱ्या साधनांमध्येही तिची मेहनत, शिस्त आणि चिकाटी आज तिला राज्य संघापर्यंत घेऊन गेली आहे.

ग्रामीण भागातून राष्ट्रीय खेळाडू

कोच अजय सांधेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरताल परिसरातून आतापर्यंत ६ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. मर्यादित साधनसुविधा असूनही हा भाग आता रग्बीसाठी एक महत्त्वाचे ग्रामीण केंद्र बनत आहे.

रग्बी प्रवासाची सुरुवात

२०२३ मध्ये कोच अजय सांधेकर यांनी वंशिकेला रामटेक संघात संधी दिली, आणि तेथून तिच्या रग्बी प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर कोच अमर भंडारवार, सुनील चौधरी आणि नेहाल डांगे यांनी तिच्या तांत्रिक कौशल्य, फिटनेस आणि मानसिक तयारीवर सातत्याने काम केले.

उल्लेखनीय कामगिरी

वंशिकाने SGFI स्कूल अंडर-१४ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे. तसेच अजमेर (राजस्थान) येथे झालेल्या वेस्ट झोन खेलो इंडिया अस्मिता रग्बी लीगमध्ये सुवर्णपदक विजेत्या संघाची ती सदस्य होती.

महाराष्ट्र संघात निवड

७ ते १३ जानेवारी २०२६ दरम्यान नाशिक येथील बार्न्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, देवळाली कॅम्प येथे झालेल्या निवड शिबिरात राज्यातील ३५ गुणवंत खेळाडूंमधून वंशिकाची महाराष्ट्र संघासाठी निवड करण्यात आली.

संघटना, ज्येष्ठ खेळाडू व प्रायोजकांचा पाठिंबा

रग्बी असोसिएशन ऑफ नागपूरने वंशिकेला आर्थिक व मानसिक आधार दिला. तसेच कामाक्षी अय्यर, इशिका मोटघारे आणि साक्षी जैन या ज्येष्ठ महिला खेळाडूंनी मार्गदर्शन केले.
साई इलेक्ट्रोटेक, ताई गोळवलकर महाविद्यालय (रामटेक) आणि धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर (Official Training Partner) यांनी प्रशिक्षणासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.

ग्रामीण मुलींसाठी प्रेरणास्थान

वंशिका डोडकेची ही यशोगाथा ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही योग्य मार्गदर्शन, संघटनांचा पाठिंबा आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर राष्ट्रीय स्तर गाठता येतो, हे तिने सिद्ध केले आहे.

रग्बी असोसिएशन ऑफ नागपूर तर्फे वंशिका डोडके हिचे अभिनंदन करण्यात येत असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News