चंद्रपूर – घुग्घुस-वणी मार्गावरील हंसराज पेट्रोल पंपापासून ते बेलोरा पुलिया पर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा पथदिवे बसवून रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख सुमित कोहळे यांनी केली आहे.
वाढत्या लोकसंख्येसोबत या मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, रस्त्याची दुरवस्था, मोकाट जनावरे आणि वाढते धूळप्रदूषण यांमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरिकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.
सौंदर्यीकरणासोबतच चौकांवर आकर्षक लाईटिंग व फुलबागांचे नियोजन करून नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच परिसराचे सौंदर्य वाढविणे आवश्यक असल्याचे कोहळे यांनी सांगितले. या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ते नियोजन करावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.
या वेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष निशांत ठाकरे व साहिल मानकर उपस्थित होते.




