नागपूर : कामठी महामार्गावरील महामेट्रो नागपूरच्या डबल डेकर वायाडक्टला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जगातील “सर्वात लांब मेट्रो डबल डेकर वायाडक्ट” म्हणून मान्यता दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामगिरी येथील मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी आज हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान केले.
कामठी महामार्गावरील हा डबल डेकर वायाडक्ट एकूण 5626.44 मीटर लांबीचा असून, भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात लांब मेट्रो डबल डेकर वायाडक्ट ठरला आहे. एकाच कॉलम पिअरवर उभारण्यात आलेला हा डबल डेकर उड्डाणपूल स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण मानला जातो.
सदर डबल डेकर वायाडक्टचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आले होते.





