प्रणयकुमार बंडी
घुग्घुस (चंद्रपूर) : विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार प्रत्येक कामगाराला साप्ताहिक सुट्टी मिळणे हा मुलभूत अधिकार आहे. मात्र, घुग्घुस नगरपरिषदेमधील मजूर कर्मचाऱ्यांना मागील जवळपास एक वर्षापासून साप्ताहिक सुट्टी मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
यामागे नगरपरिषदेतील एका अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय कारणीभूत असून, या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार मजूर कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे नगरपरिषदेसह जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात, मजूर कर्मचाऱ्यांना तत्काळ साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी, तसेच साप्ताहिक सुट्टी बंद करण्याचा नियम लादणाऱ्या अधिकाऱ्यावर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत शिवसेना (उ.बा.ठा) संघटक इंजि. अमित बोरकर यांनी इशारा दिला की, जर प्रशासनाने या विषयावर तात्काळ कार्यवाही केली नाही, तर शिवसेना घुग्घुस नगरपरिषद विरोधात तीव्र आंदोलन उभारेल आणि याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील.
या प्रसंगी घुग्घुस शिवसेना (उ.बा.ठा) चे शिष्टमंडळ उपस्थित होते.





