गडचिरोली : ताडगाव जंगल परिसरात घातपात घडवून आणण्यासाठी रेकी करणाऱ्या जहाल माओवादी (सदस्य, भामरागड दलम) याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. खून, जाळपोळ आणि भुसुरुंग स्फोटासारख्या अनेक नक्षली कारवायांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
दलममधील कार्यकाळ
२०१६ ते २०२१-२२ या कालावधीत महाकाने जनमिलीशिया पदावर काम केले.
२०२१-२२ साली तो भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला.
२०२२ पासून तो परायनार व आसपासच्या जंगल परिसरात राहून पोलिसांची माहिती गोळा करणे व गरजेनुसार दलमसोबत विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी होत होता.
कार्यकाळात केलेले गुन्हे
जाळपोळ (२०२२) : मौजा धोडराज ते ईरपनार मार्गावरील पेनगुंडा रस्त्यावर माओवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती, यात त्याचा सहभाग होता.
खून (२०२३) : मौजा पेनगुंडा येथे एका निरपराध इसमाचा खून करण्यात त्याने प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
इतर प्रकरणे (२) : भुसुरुंग स्फोट आणि इतर नक्षली कारवायांमध्ये सहभाग.
गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नक्षली संघटनेला मोठा धक्का बसला आहे.





