चंद्रपूर | विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता चंद्रपूर महानगरपालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये बालसुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आता 24 शाळांमध्ये एकूण 256 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे विद्युत विभागामार्फत बसवले गेले असून उर्वरित 2 शाळांमध्ये लवकरच बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महानगरपालिकेच्या एकूण 26 शाळांपैकी 24 शाळांमध्ये हे सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. आयुक्त व प्रशासक विपीन पालीवाल यांनी शाळांमध्ये सीसीटीव्ही जाळे उभारण्याचे निर्देश दिल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली. शाळांमध्ये शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
बदलापूर शाळा प्रकरणानंतर वाढली होती मागणी
अलीकडेच बदलापूर येथील शाळेत घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात शालेय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यात शाळांमध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले होते.
4333 विद्यार्थ्यांचा सीसीटीव्ही अंतर्गत समावेश
महानगरपालिकेच्या 21 इमारतींमध्ये 24 प्राथमिक आणि 2 माध्यमिक शाळा असून त्यात 4333 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता हे सर्व विद्यार्थी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहेत. विशेष म्हणजे, या कॅमेऱ्यांचे नियंत्रण शाळेतील मुख्याध्यापकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या ठिकाणी लावले गेले कॅमेरे
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कॅमेरे प्रवेशद्वार, वर्गखोल्या, मैदान, वंराडा, पॅसेज, जिने आणि शौचालयाच्या बाहेरील परिसरात बसविले गेले आहेत. याशिवाय अन्य महत्वाच्या ठिकाणीही सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
ही यंत्रणा लवकरच संपूर्ण महापालिकेच्या शाळांमध्ये पूर्णत्वास जाणार असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.





