चंद्रपूर — अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करावी, या मागणीसाठी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज (शुक्रवार) एक महत्त्वाचे पत्र (पत्र क्र. ५४३/२०२५) पाठवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खासदार धानोरकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सरळ सेवा प्रवेशाने रिक्त पदांवर अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या, परंतु प्रत्यक्ष सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे, जे अन्यायकारक आहे.
याच संदर्भात आज वरोरा येथे अनुकंपा पेन्शन संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी खासदार धानोरकर यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले. यावेळी गुरुदास गुरनुले, नितीन साखरे, वीरेंद्र पिल्लेवान, हरीश मांढरे, नितीन उमरे, गजानन बोरकुटे आदी उपस्थित होते.
धानोरकर यांनी पत्रात नमूद केले की, २ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयात अशा कर्मचाऱ्यांचा उल्लेखच नाही. केंद्र शासनाने मात्र त्यांच्या धोरणात अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने देखील तत्काळ सुधारित निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी त्यांनी विनंती केली.
“या कर्मचाऱ्यांची मागणी न्याय्य असून, त्यांच्या कुटुंबांवरील सामाजिक आणि आर्थिक ताण लक्षात घेता जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे ही वेळेची गरज आहे,” असे धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
अनुकंपा तत्त्वावर सेवा मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला न्याय मिळावा आणि त्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेची हमी मिळावी, यासाठी धानोरकर यांच्या या पुढाकाराला राज्यभरातून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.