मुंबई : राज्यातील प्रतिबंधित पानमसाला, गुटखा तसेच भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत राज्यव्यापी विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या सात दिवसांच्या धडक मोहिमेत एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत राज्यभरातील २०३ आस्थापनांवर छापे आणि कारवाई करण्यात आली. यापैकी ८६ आस्थापने सील करण्यात आली असून, विविध ठिकाणांहून ३४ लाख ५ हजार ४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ या संकल्पनेअंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देणे तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे हा होता.
अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्न उत्पादक, अस्वच्छ पद्धतीने अन्न तयार करणारे व्यावसायिक आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर लक्ष केंद्रित करून तपासणी केली. या कारवाईमुळे राज्यभरातील अन्न सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळणार असून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची ठरली आहे.
प्रशासनाने नागरिकांना भेसळयुक्त अथवा संशयास्पद अन्नपदार्थांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.




