चंद्रपूर, १४ मे २०२५: जिवती तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती जिवती येथे भव्य जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर जागेवरच तोडगा निघाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांनी रस्त्यांची दुरवस्था, वनहक्काचा प्रश्न, अनियमित वीजपुरवठा, आरोग्य सेवा, पाणीटंचाई अशा विविध मुद्द्यांवर आपली व्यथा मांडली. खासदार धानोरकर यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून कार्यवाहीचे निर्देश दिले.
विशेष म्हणजे, रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा आणि आरोग्यसेवा यासारख्या मुद्द्यांवर काही ठिकाणी तात्काळ तोडगा काढण्यात आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांना समस्यांवर त्वरेने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन पाणीटंचाई आणि महावितरण संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खासदारांनी दिले.
तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील १२ गावांच्या सीमावादावरही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे त्यांनी जाहीर केले.
या दरबाराला काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, उपविभागीय अधिकारी माने, तहसीलदार रुपाली मोगरकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपसभापती सुग्रीव गोतावडे, तालुका अध्यक्ष गणपत काळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले की, “जिवती तालुक्यातील जनतेच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. हा संवाद पुढेही सुरू राहील. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी मी सदैव तत्पर आहे.”
या दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आणि थेट संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.