चंद्रपूर, १८ मे: गडचांदूर-नगराळा-येल्लापूर ही महत्वाची एसटी बस सेवा तब्बल सव्वा महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य परिवहन मंडळाकडे जोरदार पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, सदर बस सेवा आजपासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार वर्ग व ज्येष्ठ नागरिक यांना विशेषतः रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ येत होती. या पार्श्वभूमीवर खासदार धानोरकर यांनी परिवहन मंडळाला पत्र क्रमांक 1794/2025 द्वारे निवेदन सादर करत, गडचांदूर-नगराळा-येल्लापूर-जिवती ही बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.
जिवती येथे झालेल्या आढावा बैठकीतही नागरिकांनी बस बंदमुळे होणाऱ्या त्रासाची माहिती खासदार धानोरकर यांना दिली होती. याची तात्काळ दखल घेत राजुरा आगार प्रमुख राकेश बोधे यांनी आवश्यक पावले उचलून ही बस सेवा पूर्ववत सुरू केली आहे.
या निर्णयामुळे परिसरातील शेकडो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बस सेवेचा पूर्वीप्रमाणे लाभ मिळू लागल्याने स्थानिक जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.