मुंबई : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर ईडीने केलेले आरोप हे खोटे, निराधार आणि राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असून, या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘ईडी हटाव, लोकशाही वाचवा’, ‘सत्याच्या मार्गावरच सोनिया-राहुल’ अशा घोषणा देत संताप व्यक्त केला.
आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी केलं. त्यांनी म्हटलं, “ईडी ही आता तपास संस्था न राहता केंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारी राजकीय सूडाची यंत्रणा बनली आहे. लोकशाहीत विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी संस्थांचा वापर करणं ही अतिशय गंभीर आणि धोकादायक बाब आहे.”
कार्यकर्त्यांनी मागणी केली की, केंद्र सरकारने तपास संस्थांचा गैरवापर थांबवावा आणि विरोधी नेत्यांविरोधातील खोट्या कारवायांना पूर्णविराम द्यावा. अन्यथा देशभरात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पोलीस बंदोबस्तात शांततेत हे आंदोलन पार पडलं.