चंद्रपूर – आता कृषी विषयक केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) अनिवार्य करण्यात आले आहे. १५ एप्रिल २०२५ पासून ही अट लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून हा ओळख क्रमांक प्राप्त करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
‘ॲग्रिस्टॅक’ योजनेंतर्गत डिजिटल शेतीचा नवा टप्पा
केंद्र शासनाच्या ‘ॲग्रिस्टॅक’ (AgriStack) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक शास्त्रीय व उत्पादक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या योजनेतून शेतकऱ्यांची जमीन, पीक, उत्पादन, हवामान, बाजारपेठ आणि विविध योजना यांची माहिती एकत्र करून डिजिटल डेटाबेस तयार केला जात आहे.
शेतकऱ्यांचे डिजिटल प्रोफाइल तयार करताना, महसूल विभागातील भू-नोंदी, पीक पद्धती व शेताचा भू-संदर्भ (जिओ रेफरन्स) यांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीच्या आधारे प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) दिला जातो.
शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
सरकारी योजना सहज मिळणार – अनुदान, पीक विमा, कर्ज आदी सेवा वेगाने उपलब्ध होतील.
तंत्रज्ञानाचा वापर – हवामान अंदाज, माती परीक्षण व उत्पादन पद्धती यांची माहिती मिळेल.
बाजारपेठेशी थेट संपर्क – बाजारभाव व थेट विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध.
DBT प्रणालीचा लाभ – आर्थिक मदत थेट बँक खात्यावर.
नोंदणी प्रक्रिया सुलभ – कागदपत्रांची गरज कमी.
धोके व नुकसान कमी – विमा व आपत्ती व्यवस्थापन सेवा तत्पर.
शेतकऱ्यांना आवाहन
ज्यांनी अद्याप फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नाही, त्यांनी ग्राम कृषी विकास समिती, सीएससी केंद्र किंवा क्षेत्रीय कृषी यंत्रणा यांच्या मदतीने ॲग्रिस्टॅक पोर्टलवर त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
ही नोंदणी करून शेतकऱ्यांनी शेतीला डिजिटल जोड देऊन अधिक फायद्याचे व सुरक्षित शेती करणारा मार्ग स्वीकारावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.