वाशीम : पश्चिम विदर्भाची आध्यात्मिक काशी म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील डव्हा येथे नाथनंगे महाराजांच्या वार्षिक यात्रेला भव्य उत्साहात सुरुवात झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत विदर्भासह पंचक्रोशीतून लाखो भाविक दाखल झाले आहेत.
दुपारनंतर यात्रेच्या मुख्य सोहळ्याचा शुभारंभ पालखी मिरवणुकीने झाला. धार्मिक वातावरणात गजर आणि भक्तिरसात न्हालेल्या या सोहळ्यात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तब्बल ४५ ट्रॅक्टरच्या माध्यमातून २ लाख भाविकांना २५१ क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, शिस्तबद्ध रांगेत राहून भाविकांनी भक्तिभावाने प्रसादाचा लाभ घेतला.
नाथनंगे महाराजांची यात्रा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी असल्याने याठिकाणी हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने दरवर्षी हजेरी लावतात. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व सेवेकरी अहोरात्र मेहनत घेत आहेत. आगामी दोन दिवस यात्रेच्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.




