नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांच्या स्वच्छतेसाठी चार नवीन ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. या नव्या मशीनद्वारे शहरातील रस्ते आणि उड्डाणपुलांची सफाई अधिक प्रभावीपणे केली जात आहे.
यापूर्वी महानगरपालिकेकडे तीन स्वीपिंग मशीन उपलब्ध होत्या. आता नव्याने चार मशीनची भर पडल्यामुळे नागपूर शहरात आता एकूण सात मशीन्सद्वारे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या आधुनिक स्वीपिंग मशीनमुळे शहरातील मुख्य रस्ते आणि उड्डाणपूल अधिक स्वच्छ राहणार असून, धूळ आणि कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
याशिवाय, नागपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) आणखी सहा ‘मॅकेनाइज्ड रोड स्विपिंग मशीन’ ची मागणी केली आहे. या मशीन मिळाल्यास शहरातील स्वच्छतेसाठी अधिक व्यापक उपाययोजना राबवणे शक्य होईल.
शहराच्या स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागपूर महानगरपालिका नागपूरकरांना स्वच्छ आणि सुंदर शहर देण्यासाठी प्रयत्नशील आहे.




