चंद्रपूर : जिल्ह्यातील मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू होण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची बातमी हा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा व महत्त्वाचा टप्पा आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही योजना प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
मुलसह पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही आणि इतर भागातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण त्यांच्या घराजवळच मिळू शकणार आहे. हे महाविद्यालय स्थानिक शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करेल तसेच आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणेल.
शासकीय कृषी महाविद्यालयाप्रमाणेच तंत्रनिकेतन महाविद्यालय देखील शहराच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीस हातभार लावेल. यामुळे मूल हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकार आणि संबंधित विभागाच्या तातडीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना लवकरच नव्या शैक्षणिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.




