मुंबई : चीनमध्ये सध्या एचएमपीव्ही (ह्युमन मेटाप्नेमोव्हायरस) या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या विषाणूमुळे मुलांमध्ये, वयोवृद्धांमध्ये आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये श्वसनविषयक समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. आरोग्य विभागाने या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना व सूचना जारी केल्या असून नागरिकांनी त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एचएमपीव्ही विषाणूविषयी महत्त्वाचे मुद्दे:
हा विषाणू श्वसनमार्गांवर परिणाम करतो आणि सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, तसेच श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया किंवा ब्रॉन्कायटिस होण्याचा धोका आहे.
सुरक्षात्मक उपाययोजना:
1. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा.
2. नियमितपणे हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा.
3. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा.
4. खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू वापरा.
5. लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आरोग्य विभागाचे आवाहन:
या विषाणूपासून स्वत:चे व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि आरोग्यविषयक निर्देशांचे पालन करावे. विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून संसर्ग टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.




