घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. क्यूआर कोडद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा देणारी एकमेव घुग्घुस नगरपरिषद आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी संबंधित QR कोड बसविण्यात आला असून कोणताही नागरिक तो स्कॅन करून नगरपरिषदेशी संबंधित तक्रार नोंदवू शकतो, या तक्रारीची नगरपरिषदेने तातडीने दखल घेतली आहे. आणि तक्रारीचे निवारण केल्यानंतर संबंधित नागरिकांना दूरध्वनी, एसएमएस किंवा ईमेलद्वारे अभिप्राय दिला जातो. गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे.
शहरातील पथदिवे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, उद्याने किंवा नगर परिषदेशी संबंधित कोणतीही तक्रार करण्यासाठी नागरिकांना यापुढे नगर परिषदेकडे जाण्याची किंवा अर्ज करण्याची गरज नाही. विशेषत: याद्वारे नागरिकांना 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस तक्रार नोंदवही उपलब्ध करून देण्यात आली आहे.