पाईपलाईन रोडवरील अनधिकृत केबल हटविण्याची मोहीम सुरू
अहिल्यानगर : शहरातील पायाभूत सुविधा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आकर्षक करण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर महानगरपालिकेने पाईपलाईन रोडवरील अनधिकृत टी.व्ही. केबल तसेच इतर अनधिकृत केबल हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे रस्त्यांवरील अडथळे दूर होण्यास, नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होण्यास आणि शहराचे सौंदर्य जपण्यास मदत होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान सी.सी.टी.व्ही. केबलना वगळण्यात आले असून, केवळ अनधिकृतरीत्या टाकण्यात आलेल्या टी.व्ही. केबल व इतर केबल्स हटविण्यात येत आहेत. शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत केबलचे जाळे वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढत असल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
महानगरपालिकेने संबंधित केबल सेवा पुरवठादारांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, यापुढे शहरात कोणत्याही ठिकाणी अनधिकृत पद्धतीने टी.व्ही. केबल किंवा इतर केबल वायर टाकू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढील काळात अधिक व्यापक आणि प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरात सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध केबल व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागांतही राबविण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी नागरिकांनी तसेच संबंधित सेवा पुरवठादारांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




