गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करण्याचे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीसांनी मोठी कारवाई करत अवैध दारूसह चारचाकी वाहन असा एकूण 14 लाख 87 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे आरोपी बनावट नंबर प्लेट लावून वाहनाद्वारे अवैध दारूची वाहतूक व विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही काहीजण छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी अशा अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात कठोर व प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
याच अनुषंगाने दिनांक 21 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली तसेच पोलीस स्टेशन अहेरी येथील संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. दरम्यान, संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला. वाहनावर बनावट नंबर प्लेट लावून दारूची तस्करी केली जात असल्याचेही निदर्शनास आले.
पोलीसांनी तत्काळ कारवाई करत अवैध दारू, चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण 14,87,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा अवैध धंद्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.




