पुणे : पुणे येथे नुकत्याच झालेल्या 20 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या श्वानपथकातील श्वान ‘सारा’ हिने सुवर्णपदक पटकावून यशाची नोंद केली आहे.
श्वानपथक स्पर्धेमधील गुन्हे शोधक प्रकारात साराने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत पहिले स्थान मिळवले. तिच्या उत्तम कामगिरीमुळे गडचिरोली पोलीस दलाचा सन्मान उंचावला आहे.
या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पोलीस श्वानपथकांनी सहभाग घेतला होता. साराने नेमकेपणा, तत्परता आणि गुन्हे शोधण्यातील उत्कृष्ट कौशल्य दाखवत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
गडचिरोली पोलीस अधीक्षकांनी साराच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत तिचे आणि तिच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. या यशामुळे गडचिरोली पोलीस दलाची शान वाढली असून, राज्यात श्वानपथक प्रशिक्षणाबाबत एक आदर्श निर्माण झाला आहे.





