Monday, April 20, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

दुर्दैवी रेल्वे अपघातानंतर पुन्हा प्रश्न – मुंबईकरांच्या सुरक्षिततेचं काय?

मुंबई : आज सकाळी मुंबईत घडलेला रेल्वे अपघात अत्यंत दुर्दैवी ठरला. या घटनेत अनेक निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मुंबईसारख्या प्रगत शहरात अशा घटना वारंवार घडणं म्हणजे व्यवस्थेचं अपयशच म्हणावं लागेल. ही केवळ अपघाताची बाब नाही – ही व्यवस्थेतील दुर्लक्षाची, नियोजनशून्यतेची आणि संवेदनाशून्यतेची साक्ष आहे.

मुंबईत दररोज लाखो प्रवासी रेल्वेवर अवलंबून असतात. ही लाईफलाइन जिच्यावर संपूर्ण शहराची धावपळ चालते, तीच दिवसेंदिवस अपयशाची वाटचाल करत आहे. दररोज कोणी ना कोणी जखमी होतं, अपघातांना बळी पडतं, पण तरीही जबाबदार यंत्रणा आणि सरकार यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीत.

गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. आम्हीही ही मागणी वारंवार केली, पण आजपर्यंत कोणत्याही सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. प्रत्येक सरकारने ही मागणी ऐकून दुर्लक्ष केलं आणि दरवेळी निवडणूक आली की केवळ आश्वासनांची पुडं फेकली.

मुंबईचं शहर नियोजन आज पूर्णपणे कोलमडलं आहे. लाखोंच्या संख्येने लोक शहरात येत आहेत, पण त्यांच्यासाठी सुविधा नाहीत. उंच उंच इमारती बांधल्या जात आहेत, मेट्रो आणि उड्डाणपुलांचे प्रकल्प राबवले जात आहेत – पण या सगळ्याचं नियोजन अपुरं आहे. पार्किंगची सोय नाही, रस्त्यांची क्षमता संपली आहे, रेल्वेवरचा भार वाढतोच आहे.

ट्रॅफिकचा प्रश्न प्रत्येक शहरात गंभीर बनत चालला आहे. पण नवनवीन रस्ते बांधून किंवा मेट्रो टाकून हे प्रश्न सुटत नाहीत – कारण मुळात बाहेरून येणाऱ्या लोंढ्याचं नियोजनच केलेलं नाही. कोणतंच सरकार शहरांच्या क्षमतेचा विचार करत नाहीये. हे सगळं फक्त अंधाधुंद विकासाचं आणि मतदानाचं राजकारण आहे.

खरं सांगायचं तर, सध्या सगळं लक्ष केवळ राजकीय युती आणि प्रचारावर केंद्रित आहे. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?” यावर चर्चा रंगतात, पण मुंबईत माणसं कशी जगतात यावर कोणी बोलत नाही. माध्यमं देखील TRP आणि गॉसिपच्या मागे धावतायत, लोकांच्या मूळ प्रश्नांवर कोणीच बोलायला तयार नाही.

आजचा अपघात ही एक चूक नाही – ही व्यवस्थेच्या अपयशाची किंमत आहे, जी सामान्य माणूस रोज चुकवतोय. माणसाच्या जीवाला इथं किंमत नाही. खासदार, आमदार, मंत्री हे परदेशात जातात, तिथल्या व्यवस्था पाहतात – पण त्यातून काही शिकून येतात का?

परदेशात अशा घटना घडल्यास जबाबदारांना तत्काळ कारवाईला सामोरं जावं लागतं. सार्वजनिक सुरक्षेला तिथं सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. पण आपल्या देशात, सगळं विसरून पुढची बातमी कुठली याकडेच सगळ्यांचं लक्ष असतं.

म्हणून प्रश्न असा आहे — आपण कधी यावर बोलणार आहोत? माध्यमं हे प्रश्न सरकारसमोर मांडणार आहेत का? आपण लोक शेवटी आपली व्यथा कोठे मांडायची?

मुंबईच्या गजबजलेल्या स्टेशनवर उभं राहिलं, तर धडकी भरते. पण याच परिस्थितीत दररोज लाखो मुंबईकर जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. ही लढाई केवळ प्रवासाची नाही – ही लढाई माणूस म्हणून आपल्याला वागवलं जातंय की नाही याची आहे.

वेळ आली आहे की आपण लोकांनीच या प्रश्नांवर आवाज उठवायला हवा. कारण एक दिवस तुमचं किंवा आपल्या कुणाचं नाव त्या मृतांच्या यादीत येईल, आणि मग खूप उशीर झालेला असेल.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News