Monday, April 20, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर जिल्हा वार्षिक योजना 2025-26 : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या लोकहितकारी मागण्या चर्चेत

चंद्रपूर : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या दृष्टीने, आगामी जिल्हा वार्षिक योजना 2025-26 संदर्भातील बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि लोकहितकारी मागण्या जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्या.

आज जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, खासदार नामदेव किरसान, आमदार विजय वडेट्टीवार, सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, कीर्तिकुमार भांगडिया, किशोर जोरगेवार, देवराव भोंगाडे, करण देवतळे तसेच जिल्हाधिकारी विजय गौंडा, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या मागण्या व सूचना

कर्जमाफी आणि गोठवलेली खाती:
खासदार धानोरकर यांनी स्पष्ट केले की, अनेक शेतकऱ्यांनी संभाव्य कर्जमाफीच्या अपेक्षेने जुनी कर्जे भरली नाहीत. मात्र शासनाने संबंधित खात्यांवर निर्बंध घातले आणि ती गोठवली, ज्यामुळे शेतकऱ्यांची नवीन कर्ज घेण्याची क्षमता ठप्प झाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत गंभीर संकट आहे. त्यामुळे तातडीने ही खाती पूर्ववत सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘हिरकणी कक्ष’:
प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. स्तनपान करणाऱ्या मातांना सुरक्षित व खाजगी जागा उपलब्ध झाल्यास, त्या अधिक निवांतपणे तक्रारी नोंदवू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पोलीस ठाण्यांचे आधुनिकीकरण आणि निवास व्यवस्था:
पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पोलीस ठाण्यांचे आधुनिकीकरण करणे आणि कर्मचाऱ्यांसाठी ठाण्यांच्या शेजारीच निवासस्थानांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची मागणी त्यांनी मांडली.

अंगणवाड्यांचे सुसज्जीकरण:
बालकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या सुसज्ज व आधुनिक स्वरूपाच्या करण्याची सूचना त्यांनी केली.

मोफत शववाहिका सेवा:
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयासह शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मोफत शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

“या सर्व मागण्या जिल्ह्याच्या गरजा आणि नागरिकांच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहेत. जिल्हा वार्षिक योजना 2025-26 मध्ये या मागण्यांचा समावेश करून तात्काळ अंमलबजावणी व्हावी,” असा आग्रह खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला.

चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या मागण्या निर्णायक ठरू शकतात, असे स्पष्ट संकेत त्यांनी बैठकीदरम्यान दिले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News