घुग्घुस (चंद्रपुर) : मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, घुग्घुस येथे सोमवार, ९ जून रोजी आदिवासी समाजाचे जननायक, क्रांतिसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी विशेष उपस्थित राहून वीर बिरसा मुंडा यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना विवेक बोढे म्हणाले, “आदिवासी समाजाचे निस्सीम नेतृत्व करणारे वीर बिरसा मुंडा हे इंग्रज सत्तेविरुद्ध लढणारे थोर क्रांतिकारक होते. त्यांनी आदिवासींच्या हक्कासाठी ‘उलगुलान’ या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व केले. हे आंदोलन म्हणजे ब्रिटिश सत्तेविरुद्ध आदिवासी जनतेचे बंड होते. त्यांच्या हौतात्म्याची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी ९ जून रोजी त्यांचा स्मृतीदिन साजरा केला जातो.”
या कार्यक्रमाला डॉ. सुर्यभान वासेकर, निखिल आत्राम, मंगेश उलमाले, गौरव तुराणकर, निशा उरकुडे, प्रीती धोटे, खुशबू मेश्राम, भारती परते, स्वाती गंगाधरे, प्रिया नागभिडकर, जाई आत्राम, नेहा कुम्मरवार आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले होते.




