बीड – आज दुपारी बीड शहरामध्ये अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
पावसाच्या आणि वाऱ्याच्या तडाख्यामुळे नगर रोड परिसरात असलेल्या पोलिस पेट्रोल पंपाचे छत कोसळले. या घटनेत छताचा अर्धा भाग खाली पडला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून, काही भागांमध्ये वीज पुरवठाही खंडित झाला आहे. महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणांकडून तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून, नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू आहे.
शहरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




