मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद, चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा समारंभ मंत्रालय, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
विवेक जॉनसन यांनी चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची माहिती सादरीकरणाद्वारे मांडली. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मिशन सक्षम, मिशन अंकुर, खुली विज्ञान बाग, स्टेम लॅब, अस्ट्रोनॉमी लॅब, मोबाईल प्लॅनॅटोरियम यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत झाली आहे.
राज्यातील सर्व प्रशासकीय व सनदी अधिकाऱ्यांसाठी हे सादरीकरण NIC द्वारे प्रसारित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जॉनसन यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचे अभिनंदन केले आणि शिक्षण क्षेत्रात अशाच पद्धतीने नावीन्यपूर्ण प्रयोग सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
या सन्मानामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांना आणखी गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.




