वर्धा : सातपुडा पर्वतरांगांच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले ‘लहान महादेव’ मंदिर (ढगा) येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचीन काळापासून या ठिकाणी तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेला यंदाही हजारो भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाशिवरात्रीच्या पावन दिवशी अनेक शिवभक्त ढगा येथे मुक्काम करत असून दुसऱ्या दिवशी बारस सोडून गावी परततात. हे धार्मिक स्थळ खरांगणा-बांगडापूर जंगल परिसरात येते आणि सध्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत आहे.
धौम्म्य ऋषींच्या तपोभूमीवर शिवलिंगाची स्थापना
स्थानीय दंतकथांनुसार, प्राचीन काळी धौम्म्य ऋषींनी या परिसरात तपश्चर्या केली आणि दगडाच्या कपारीत शिवलिंगाची स्थापना केली. याच ऋषींच्या नावावरून परिसरातील ‘धाम नदी’ला हे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. या परिसरात अनेक ऋषी-मुनींनी साधना केली असून, त्यामुळे या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
श्रद्धाळूंची मोठी गर्दी, मंदिर परिसर भक्तिरसात न्हालं
महाशिवरात्रीनिमित्त ‘लहान महादेव’ यात्रेत दूरदूरून भक्तगण पोहोचले आहेत. दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या असून, मंदिर परिसर भक्तिरसात न्हाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यात्रेच्या दरम्यान विविध धार्मिक विधी, भजन-कीर्तन, महाप्रसाद आणि पारंपरिक पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
ढगा येथील ‘लहान महादेव’ यात्रेच्या निमित्ताने वर्ध्यात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या वतीने यात्रेच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.




