काटोल : तालुक्यातील कोतवालबड्डी येथे असलेल्या एशियन फायर वर्क्स या फटाका कंपनीत काल झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच जखमींवर होणाऱ्या उपचारांचा आढावा घेतला.
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी आदेश देण्यात आले असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. स्थानिक प्रशासन व पोलिसांनीही घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी फटाका उद्योगाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अधिक जागरूक राहण्याची मागणी केली आहे.




