बुलढाणा : पेनटाकळी प्रकल्पाच्या काठावर गेल्या १२ दिवसांपासून गावठाण हद्दवाढ करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले ग्रामस्थांचे उपोषण अखेर संपले. गावठाण हद्दवाढ प्रकरणाचा सकारात्मक निकाल लागल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सोमवारी लिंबू पाणी देऊन उपोषण समाप्त करण्यात आले.
गावकऱ्यांनी आपल्या मागणीसाठी ठाम राहून संघर्ष केला होता. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर गावठाण हद्दवाढ मान्य करण्यात आली. यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामस्थांच्या संयम व संघर्षाचे कौतुक करत भविष्यातही विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकारी या निर्णायक क्षणी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी हद्दवाढ मंजूर झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, भविष्यात गावाचा विकास वेगाने होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.




