मुंबई: नाशिक येथे अवैध दारूविरोधी मोहिमेत मृत्युमुखी पडलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून ₹7.5 लाखांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे.
याशिवाय, भविष्यात अशा घटनांमध्ये शासकीय मदत तात्काळ मिळावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरूपी धोरण लवकरच तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. गृह विभागाच्या धर्तीवर हे धोरण राबविण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे आदेशही त्यांनी दिले.
ही मदत मिळाल्याने जवानाच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळेल, परंतु अशा घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.




