नागपूर: महावितरणतर्फे वीज ग्राहकांना बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनोळखी क्रमांकावरून ग्राहकांना पाठविले जाणारे फसवे संदेश, जसे की “तुमचे वीज बिल अपडेट नसल्यामुळे आज रात्री वीजपुरवठा खंडित केला जाईल,” असे मेसेज पाठवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.
महावितरणने नमूद केले आहे की या प्रकारात ग्राहकांना त्वरित दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जाते. संपर्क साधल्यानंतर, ग्राहकांना एक बनावट लिंक पाठवली जाते व ऑनलाइन पेमेंटसाठी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते. या प्रक्रियेमुळे ग्राहकांच्या मोबाइल किंवा संगणकावर हॅकिंग होऊन बँक खात्यातील रक्कम चोरी होण्याचा धोका असतो.
महावितरणने अशा प्रकारच्या फसव्या संदेशांना प्रतिसाद न देण्याचे व अधिकृत वेबसाईट किंवा महावितरणच्या अॅपद्वारेच वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांनी कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास महावितरणच्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांकावर किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा.
महावितरणच्या मते, सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वीज ग्राहकांनी बनावट मेसेजकडे दुर्लक्ष करून सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




