खेरडा पांढरकवडा : मौजा खेरडा पांढरकवडा व ऐळाकेळी या शिवारात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. या ठिकाणी सरकारी टेकडी क्षेत्रातून बेकायदेशीरपणे मुरुम काढून त्याची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे हे उत्खनन पांदन लगत आणि अशोक थुल यांच्या खदानीच्या जवळच्या क्षेत्रात होत असल्याची माहिती मिळाली आहे.
अवैध उत्खननामुळे पर्यावरणीय हानी होण्याची शक्यता आहे, तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसानही होत आहे. या प्रकरणाकडे महसूल विभाग, पोलिस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात यापूर्वी अशा घटनांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे याही ठिकाणी असे काही होऊ नये, याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सरकार व संबंधित विभागांनी त्वरित कारवाई करून अवैध उत्खनन थांबवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.




