Tuesday, May 26, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जनगणना 2027 : पहिल्या टप्प्याची घोषणा, 1 एप्रिल 2026 पासून घरयादी व गृहगणनेस सुरुवात

नवी दिल्ली : देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना 2027’ च्या पहिल्या टप्प्याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या टप्प्याला 1 एप्रिल 2026 पासून सुरुवात होणार असून, यामध्ये घरयादी नोंदणी व गृहगणना (House Listing & Housing Census) केली जाणार आहे. यासाठी सरकारने 33 प्रश्नांची अधिकृत यादी अधिसूचित केली आहे.

पहिल्या टप्प्यात प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाला 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत आपल्या सोयीनुसार 30 दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

घराघरात जाऊन माहिती संकलन

या मोहिमेसाठी नियुक्त प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकी, घराचा वापर, तसेच घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (छप्पर, भिंती, मजला आदी) याची माहिती घेतील. यासोबतच कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग आणि कुटुंबप्रमुखाची सामाजिक श्रेणी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर) याबाबतही माहिती नोंदवली जाणार आहे.

मूलभूत सुविधांची नोंद

घरामधील पिण्याच्या पाण्याचा स्रोत, वीजपुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्था, शौचालयाची उपलब्धता तसेच स्वयंपाकासाठी एलपीजी किंवा पीएनजी गॅस जोडणी आहे की नाही, याचाही समावेश या गणनेत करण्यात येणार आहे.

आधुनिक सुविधा आणि जीवनशैलीचा आढावा

यावेळी नागरिकांकडे उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक साधनांची माहितीही घेतली जाणार आहे. यात रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट सुविधा, संगणक, लॅपटॉप, टेलिफोन आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे. तसेच कुटुंबाकडे असलेले वाहन आणि आहारात वापरले जाणारे मुख्य धान्य कोणते, याचीही नोंद केली जाणार आहे.

‘स्व-गणना’चा पर्याय

जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांक नोंदवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्याच्या 15 दिवस आधी नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये

पहिल्या टप्प्यातील गृहगणना प्रक्रिया सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण झाल्यानंतर, फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. या जनगणनेच्या माध्यमातून देशातील लोकसंख्या, निवास व्यवस्था आणि जीवनमानाचा सविस्तर व अद्ययावत आढावा घेण्यात येणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News