चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ताज्या व पौष्टिक भाजीपाल्याचा आहारात समावेश व्हावा, यासाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत “उत्कृष्ट परसबाग स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकूण 93 शाळांना 3 लाख 56 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार परसबागेची रचना, हवामानानुसार भाजीपाला लागवड, व्यवस्थापन, विद्यार्थी-पालक-शिक्षकांचा सहभाग, उत्पादनाचा आहारात समावेश, विक्री व सामाजिक संस्थांचे योगदान, ईको क्लबची स्थापना आदी विविध निकषांवर आधारित गुणांकन करण्यात आले.
मागील वर्षी जिल्ह्यातील 2004 पैकी 1735 शाळांनी परसबाग तयार केली होती. यामधून तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय व 3 प्रोत्साहनपर शाळा अशा 90 शाळांना एकूण 3 लाख 22 हजार 500 रुपये, तर जिल्हास्तरावरील 3 शाळांना 33 हजार 500 रुपये असे एकूण 3.56 लाख रुपयांचे बक्षीस वितरित करण्यात आले.
या उपक्रमात सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांसह पालकांचा सक्रिय सहभाग घ्यावा व उत्कृष्ट परसबाग साकारून स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल देशमुख यांनी केले आहे.




