नागपूर: दोन वर्षांपासून ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ या उपक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करणाऱ्या Association for Industrial Development (एआयडी) यांच्यावतीने ‘अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 – खासदार औद्योगिक महोत्सव’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. नागपूरच्या एनरिको हाईट्स येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि या उपक्रमाचे प्रणेते नितीन गडकरी यांच्या हस्ते अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, “विदर्भाचा औद्योगिक विकास हा ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. हा विकास विदर्भकेंद्रित राहावा, यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर कार्यरत असलेल्या गुणवत्तापूर्ण उद्योजकांना या उपक्रमाशी जोडणे आवश्यक आहे.”
‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ उपक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षमतेला चालना देण्याचा उद्देश असून, स्थानिक पातळीवरील उद्योजकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न एआयडीकडून करण्यात येत आहे. कार्यक्रमास विविध औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले होते आणि त्याला उद्योगजगताचा मोठा प्रतिसाद लाभला होता. आता या उपक्रमाचा अहवाल प्रकाशित झाल्याने भविष्यातील औद्योगिक धोरणे निश्चित करण्यात मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.




