नागपूर – नागपूरच्या वाडी नगर परिषदेच्या लगत तसेच दाभा परिसराजवळील लावा गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही बिना बैलांच्या बंड्यांचा अनोखा सोहळा पार पडला. सोनबा महाराज संस्थान आणि गावकऱ्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या परंपरेला गोरले कुटुंबीय गेली अनेक शतके जपून ठेवत आहेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी सोनबा महाराज मंदिरात विधिवत पूजा करून चार ते पाच बैलबंडी एकत्रित आणल्या जातात. त्यावर श्रद्धाळू बसतात आणि गोरले कुटुंबीयांचे वंशज जोरदार ‘होक रे होक’ अशी आरोळी देऊन त्या गाड्या मानवी वजनाच्या सहाय्याने पुढे नेतात.
गावकऱ्यांच्या मते, ही गाड्या बैलांशिवाय चालतात, ही सोनबा महाराजांची कृपा आणि गावाची श्रद्धा आहे. या वर्षीही लावा गावात भाविकांचा मोठा जनसागर लोटला होता. सोनबा महाराजांच्या जयघोषात आणि उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.