नागपूर : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूरमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. २ मार्च रोजी, रविवार सकाळी ८:३० ते १०:३० या वेळेत हा उपक्रम होणार असून, याला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या अभियानात आकाशवाणी नागपूरचे उपमहासंचालक रमेश घारडे तसेच आकाशवाणी नागपूरचे अधिकारी आणि कर्मचारी देखील सक्रिय सहभाग घेणार आहेत. नागपूर शहरातील राज्य कामगार विमा सोसायटी हॉस्पिटल, पंचवटी वृद्धाश्रम (उमरेड रोड), इमामवाडा बस आगार आणि सहकारनगर येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून नागपूरकरांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश दिला जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




